चांडोली बुद्रुकमधील तोंडली पीक सातासमुद्रापार जाणार   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील तोंडली पीक सातासमुद्रापार जाणार आहे. त्या दृष्टीने युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॉर्न कोलीस आणि डारा ओशिया यांनी भेट देवून तोंडली पिकाची गुणवत्ता आणि शेतकर्‍यांचे कौतुक केले.
 
चांडोली बुद्रुक येथे युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कॉर्न कोलीस आणि डारा ओशिया यांनी शेतकरी रमेश देवराम थोरात यांच्या तोंडली बागेला भेट दिली. या भेटीदरम्यान भारतातून युरोपियन युनियन देशांना पाठविण्यात येणार्‍या तोंडली उत्पादनाचे लागवड व्यवस्थापन व अवशेष मुक्त पद्धतीचे काटेकोर पालन होते की नाही, याची प्रत्यक्ष शेतात जाऊन सखोल पाहणी केली. 
 
पथकाने लागवड, बागेचे व्यवस्थापन, स्वच्छता, कीड-रोग नियंत्रण, विशेषतः फळमाशी नियंत्रण, फळांची तोडणी, पॅकिंग व निर्यात प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांची तपासणी केली. तोंडली उत्पादनासाठी ठरवलेल्या जागतिक दर्जाच्या कठोर नियमावलीचे पालन होते की नाही याची खात्री करण्यात आली.या दौर्‍यात युरोपियन युनियन प्रतिनिधींसोबत प्रशांत वाघमारे, आरपी क्यु एस चे उपसंचालक डॉ. अन्सारी, वनस्पती संरक्षण अधिकारी मिथुन धुमाळ, कृषी अधिकारी सुनील गिराम, मंडळ कृषी अधिकारी सोपान लांडे व शिवानंद बिराजदार, कृषी सहाय्यक साधना गंधट, तसेच संतोषकुमार हुले उपस्थित होते. यावेळी शेतकरी रमेश थोरात व कृषी सहाय्यक साधना गंधट यांच्याशी सविस्तर चर्चा करून पथकाने सखोल माहिती घेतली. महाराष्ट्रीयन पद्धतीने पाहुण्यांचा सत्कार व मानसन्मान करण्यात आला.सोपान लांडे म्हणाले, तोंडली पिकासारख्या परदेशात निर्यात होणार्‍या पिकांच्या दर्जात्मक व सुरक्षित उत्पादनासाठी शेतकर्‍यांकडून होणार्‍या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली महत्त्वपूर्ण पावती ठरणार आहे. 
 

Related Articles